अथ योगानुशासनम || 1 ||
अन्वय
अथ योग अनु शासनम |
मराठी अर्थ
अशा प्रकारे किंवा आता (अथ), (आपण) योगाचे (योग) आचरण (अनुशासन) करुयात.
विवरण
योग ही करण्याची गोष्ट आहे. गप्पा मारण्याची किंवा चर्चा, वाद विवाद करण्याची गोष्ट नाही. “अथ” अशाप्रकारे म्हणजे, या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपण योगाचा अभ्यास करणार आहोत. कोल्हटकरांच्यामते “अनु” हा शब्द वापरण्यामागे एक विशेष कारण आहे. “कोणत्याही शास्त्राचा प्रारंभ करताना अंनुबाधचतुष्टय सांगण्याचा प्रघात आहे.” (कोल्हटकर.) अंनुबंधचतुष्टय म्हणजे आपण जो अभ्यास करणार आहोत तो अभ्यास चार गोष्टींशी निगडीत असतो.
1) अधिकारी. या अभ्यासाचा अधिकारी कोण? माझ्यामते या अभ्यासाचा अधिकारी कोणीही मुमुक्षू म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा आहे व ज्याच्या मनात अनुताप आहे तो होय. काय जाणण्याची? हे शास्त्र काय आहे? त्याच्या अभ्यासाने प्राप्त काय होणार आहे? त्याचा अभ्यास कसा करावा? इतपत जिज्ञासा ज्याच्या ठिकाणी आहे आणि/किंवा मन शांत कसे होईल? आनंदाची प्राप्ती कशाने होईल अशी तळमळ अथवा इच्छा ज्याच्या मनात निर्माण होईल ती व्यक्ति या आभासची अधिकारी आहे असे मला वाटते.
2) प्रयोजन. या शास्त्राचे प्रयोजन काय? या शास्त्राचे प्रयोजन “योग” आहे. योग हा शब्द युंज या संस्कृत धातू (क्रियापद) पासून निर्माण झाला आहे ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. इथे जोडणी कशाची करायची आहे? इथे जीवाची जोडणी त्याच्या मूळ स्वरूपाशी करायची आहे. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे ज्याला मी “मी” “मी” असे म्हणतो तो. हे “माझे” घर आहे. म्हणजे घरं म्हणजे “मी” नाही. याच न्यायाने माझ्या बुद्धीला हे पटत नाही म्हणजे बुद्धी म्हणजे “मी” नाही. मग “मी” कोण? माझे स्वरूप काय? या प्रश्नाचे उत्तर हे शास्त्र देईल. किंबहुना हेच या शास्त्राचे प्रयोजन आहे.
3) विषय. या शास्त्राचा/अभ्यासाचा विषय काय? माझ्या मते सर्वात महत्वाचा विषय हा आहे की जीव आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी कसा जाईल हा होय. परंतु त्या अनुषंगाने हे शास्त्र अंत:कारणाचा सर्वार्थाने विचार करते. मन काय? बुध्द्धी काय? मनात कोण कोणत्या प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात? सध्या भाषेत, मनात कोणकोणते विचार निर्माण होतात? त्यांचा निरोध कसा करायाचा? हे सर्व करून प्राप्त काय होणार आहे? हे सर्व विषय या शास्त्रात/अभ्यासात येतात.
4) संबंध. (शास्त्राचा) अधिकारी, (शास्त्राचे) प्रयोजन, आणि (शास्त्राचा) विषय यांचा एकमेकांशी संबंध काय? (हे माझे मत कोल्हटकरांच्या मतपेक्षा थोडे वेगळे आहे.) शास्त्राचा विषय आणि शास्त्राचे प्रयोजन जो अधिकारी आहे त्या अधिकारी व्यक्तींच्या सर्व प्रश्नांना स्पर्श करून त्या प्रश्नांची व्यापक उकल करते असा संबंध या सर्वांचा एकमेकांशी आहे.
अशाप्रकारे ही भूमिका समजून घेऊन आता (अथ), (आपण) योगाचे (योग) आचरण (अनुशासन) करुयात.
सद्गुरूचरणार्पणमस्तु ||