साऊथ कॅरोलिनाचा धडा

Leave a comment

साऊथ कॅरोलिनाची प्रायमरी ही यंदाच्या अमेरिकन निवडणुकीतील अत्यंत महत्वाची पायरी होती.  महत्वाची अशासाठी की एक तर रिपब्लिकन पक्षाचा उमदेवर या निवडणुकीनी ठरवून टाकला असता किंवा, ही प्रायमरी निवडणूक ही दीर्घकाळ चालणार आणि त्याचे नुकसान रिपब्लिकन पक्षाला होणार असे ठरवणारी ही निवडणूक होती.  मग नक्की झाले काय? झाले कसे? याच्यातून राजकारणाचा अभ्यास करणार्‍याने शिकायचे काय? हे सर्व आपण थोडक्यात बघू.

या निवडणुकीनी एक मात्र ठरवले की रिपब्लिकन प्रायमरी ही दीर्घ प्रक्रिया राहणार आणि कदाचित अनेक धक्का देणारे निकाल आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील.

साऊथ कॅरोलिनाचे धडे काय?

  1. राजकरणामध्ये कोणी संपला असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे.  “अमुक संपला!” अशी भविष्यवाणी राजकरणात करणे तर बहुधा मूर्खपणाचे ठरते.
  2. वक्तृत्वाचे महत्व अमेरिकन राजकरणामध्ये देखील अनन्यसाधारण आहे.
  3. निवडणुका जिंकायच्या असतील तर शिक्षण, व्यवसाय महत्वाचा नाही तर लोकांशी नाळ बांधणे महत्वाचे.
  4. अमेरिकन राजकरणामध्ये जो माणूस आपली राजकीय विचारधारा, तत्वज्ञान उत्तमप्रकरे मांडू शकेल तो लोकांची मने आणि मते जिंकू शकेल.  हा मुद्दा महत्वाचा! (जो दोन्ही पक्ष विसरून चालले आहेत).
  5. राजकरणामध्ये कायमच सावध पवित्रा घेणे योग्य नाही.
  6. अमेरिकन राजकारण जे कन्सलटंट शिवाय चालत नाही, अशा राजकरणामध्ये कन्सलटंट किती महत्वाचे आणि अंत:स्फूर्ति किती महत्वाची याचा विचार राजकीय लोकांनी केला पाहिजे.

साऊथ कॅरोलिनाची प्रायमरी आपल्याला हे सर्व धडे कसे शिकवते हे आपण या लेखात पाहणार आहोत.

नक्की झाले काय?

या निवडणुकीमध्ये जाताना सर्व राजकीय पंडित असे मानीत होते की,

  1. मीट रोमनी हे ही निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी, संपूर्ण निवडणुका पूर्ण होण्याआधीच जिंकतील आणि प्रायमरी मध्ये जी चिखलफेक होते ती टाळून आपली सर्व शक्ति ओबामांच्या विरोधात जवळपास 9 महीने अगोदर पासून लावतील. (गंमत आहे! 9 महीने हे निवडणुकीच्या कॅलेंडरला लागू होतात आणि तेवढ्याच वेळात नवीन मानवी जीव देखील जन्म घेतो!!)
  2. एखादा कसलेला CEO जसा एखाद्या कंपनीचा कायापालट करतो तशा प्रकारे मीट रोमनी ही निवडणुकीची बाजी मारतील.
  3. ओबामांच्या विरुद्ध मीट रोमनी हेच रिपब्लिकन पक्षाचे सर्वोत्तम प्रतिस्पर्धी आहेत.
  4. रिपब्लिकन पक्षातील कडव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा प्रायमरी निवडणुकीत जाणवणार नाही.

अशा अनेक तर्क वितर्कान्ना छेद देऊन न्यूट गिंगरीच यांनी ही निवडणूक 40% मते जिंकून जिंकली.  गिंगरीच यांनी रोमनी यांच्यापेक्षा तब्बल 12% मते जास्त मिळवली.  गिंगरीच संपले अशा अवया उठवणार्‍या पंडितांचे भविष्य गिंगरीच यांनी कष्टाच्या जोरावर चुकीचे ठरवले. तळगाळातल्या रिपब्लिकन मतदारांशी नाळ जोडत, ओबामांच्या पुरोगामी विचारसरणीला (progressive/liberal) आपल्या परंपरावादी (conservative) विचारसारणीने अतिशय सडेतोड उत्तरे देत गिंगरीच यांनी ही बाजी मारली.

हे झाले कसे?

हे झाले कसे असा विचार माझ्या मनात जेव्हा आला तेव्हा भोंडल्यातल्या “अस्से कस्से जाले, माझ्या नशिबी आले”, असे मीट रोमनी आता म्हणत नसतील ना असे उगाचच वाटून गेले.

न्यूट गिंगरीच यांनी बाजी मारली यात शंकाच नाही पण त्याचबरोबर मीट रोमनी यांनी हातातला सामना घालवला  असेही म्हणायला हरकत नाही.

रोमनी यांच्या व्यक्तिमत्वातल्या कमतरता

मीट रोमनी हे कॅपिटल मॅनेजमेंट या व्यवसायात आहेत.  अशा प्रकारचे व्यावसायिक मोठाले म्यूचुअल फंड्स कडून पैसा घेतात आणि तो पैसा निरनिराळ्या धंदयानमद्धे गुंतवतात.  जेव्हा अशा धंद्यामध्ये फायदा होतो तेव्हा हे कॅपिटल मॅनेजर फी या रूपात पैसा कमावतात.  अमेरिकेतील टॅक्स धोरण असे आहे की जरी ही फी उत्पन्न म्हणून असली तरी ती फी या स्वरुपात असल्याने तिला इन्कम टॅक्स लागू होत नाही.  अशा उत्पन्नाला deferred interest payment असे संबोधले जाते आणि त्याच्या वरचा टॅक्स वेगळा आणि कमी असतो. त्यामुळे सध्याच्या काळात जेव्हा गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढते आहे, श्रीमंत कोणत्याही परिस्थितीत आपली श्रीमंती टिकवतात आणि वाढवतात आणि त्याच वेळी, कालचा मध्यमवर्ग आजच्या गरीब वर्गात गणला जातो, अशावेळी रोमनींचे टॅक्सेस हा एक मोठा चर्चेचा विषय झाला.  रोमनींच्या कोलांट्याउड्या मारायच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आपण आपले इन्कम टॅक्स रिटर्न जनतेसमोर मांडणार नाही अशी भूमिका घेतली.  त्यावर त्यांचे विरोधक तुटून पडले.

रोमनी हे आपला खासगी व्यावसायिक अनुभव मोठ्या अभिमानाने मिरवीत होते. आपल्या कॅपिटल मॅनेजमेंट च्या व्यवसायातून आपण 1 लाखाहून अधिक नोकर्‍या निर्माण केल्या अशा प्रकारचा दावा ते सतत करीत असत. रोज रोज हे ऐकायला लागल्यावर त्याची स्क्रुटिनी होणारच!  कॅपिटल मॅनेजमेंट करणारी लोकं अनेकवेळेला डबघाईला आलेले व्यवसाय कवडीमोलणे विकत घेतात. विकत घेताना कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी आपला अशा डबघाईला आलेल्या कंपन्यांमधला हिस्सा वाढवते, कारण जेव्हा हा उद्योग सावरला जाईल तेव्हा याच हिश्ष्याची किंमत खूपच मोठी होते. कॅपिटल मॅनेजमेंट ह्या कंपन्या खासगी स्वरुपाच्या असल्यामुळे त्यांना रेपोर्टिंग चे बंधन नसते त्यामुळे ते व्यवसायाची पुनर्बांधणी उत्तम प्रकारे करू शकतात. अशा पुनर्बांधणी (restructuring) मध्ये कामगार कमी करणे, हा एक मोठा भाग असतो. त्यामुळे अनेकांना नोकर्‍यांना मुकावे लागते.  तसेच bankruptcy दाखल करणे हे देखील मोठे साधन हाती असते. Bankruptcy दाखल केल्यावर अनेक प्रकारची देणी देणेकर्‍याला न देण्याची मुभा असते. त्यामुळे स्वाभाविकच असे धंदे फायदेशीर करून कॅपिटल मॅनेजमेंट कंपन्या ते धंदे मोठ्या फायद्याने विकतात. याचे एक उत्तम आणि सध्याच्या काळातील उदाहरण म्हणजे Chrysler मोटर कंपनी.

रोमनी हे अशा प्रकारच्या व्यवसायमध्ये असल्याने व त्यांनी आपले टॅक्स रिटर्न्स खुले न करण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.  त्यांचे एक विरोधक Rick Perry हे तर असे म्हणाले की हा कसला आलाय “venture capitalist” हा तर “vulture (गिधाडे) capitalist” आहे. मी या लेखात मुद्दाम venture capitalist हा शब्द वापरला नाही कारण माझ्या मते रोमनी जे करतात त्याला कॅपिटल मॅनेजमेंट हाच योग्य शब्द आहे, venture capitalism हा अयोग्य शब्द आहे. आता जो पक्ष स्वत:ला capitalism  चा रक्षणकर्ता समजतो त्याच पक्षाच्या उमेदवारांनी जेव्हा असे हल्ले रोमनिंवर चढवायला सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकच हा विषय मोठ्या चर्चेचा झाला. उदा. रोमनींच्या कारकिर्दीत नक्की किती नोकर्‍या निर्माण झाल्या? किती लोकांच्या नोकर्‍या गेल्या? अशाप्रकारचा व्यवसाय नैतिक दृष्ट्या योग्य आहे का? अशाप्रकारच्या व्यवसायिकांवर जो टॅक्स आकाराला जातो, ज्या अनेक प्रकारच्या करसवलती दिल्या जातात त्या योग्य आहेत का? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेचे गूराळ चालू झाले. यातून एक गोष्ट झाली की आत्तापर्यंत रोमनींना बचावाचा पवित्र कधीच घ्यायला लागला नव्हता तो आता त्यांना घ्यायला लागला. यातून त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. रोमनींच्या व्यक्तिमत्वातल्या कमतरता लोकांसमोर प्रखरतेनी येऊ लागल्या.

न्यूट गिंगरीच

न्यूट गिंगरीच हे अमेरिकन राजकारणातले एक अनोखे व्यक्तिमत्व आहे. गिंगरीच हे क्लिंटन यांच्या काळात अमेरिकन प्रतींनिधी सभागृहाचे सभापति होते.  त्याकाळात गिंगरीच यांनी contract with America नावाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  या जाहीरनामयामध्ये परंपरावादी (Conservative) विचारसरणीचे अनेक कार्यक्रम त्यांनी समाविष्ट केले.  केंद्रीय सरकार अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असावे, बेकार भत्ता, मर्यादित स्वरूपाचा असावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना मदत करताना त्याला काळाचे बंधन असावे, अशा अनेक कल्पनांचा समावेश या contract with America या जाहीरनामयामध्ये होता. अवाढव्य अशा केंद्रीय सरकारचे स्वरूप बदलू शकणार्‍या या कल्पांनाना अमेरिकन नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला आणि अनेक वर्षांनंतर रिपब्लिकन पक्ष प्रतींनिधी सभागृहात सत्तारूढ झाला, आणि गिंगरीच सभागृहाचे सभापति झाले.  सभापति या नात्याने कोणता विषय सभागृहात मांडायचा आणि कोणता विषय टाळायचा याचा मोठा अधिकार गिंगरीच यांना प्राप्त झाला. गिंगरीच यांनी क्लिंटन यांच्या बरोबर काम करीत अनेक सुधारणा केल्या परंतु आपला बेशिस्त आणि फटकळ स्वभाव त्यांना अडचणीचा ठरला.  यातूनच पुढे नैतिक दुरवरतांनाच्या आरोपांमुळे त्यांना प्रतींनिधी सभागृहाचा राजीनामा द्यावा लागला.

गिंगरीच यांच्या कारकीर्दीमध्ये जारी अनेक चढ उतार झाले असले तरी त्यांच्याकडे अनेक गुण आहेत की ज्यामुळे त्यांना conservative  तत्वज्ञानाचे विचारवंत असे ओळखले जाते. त्यांच्या गुणांमधला सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची विषय समजावून सांगण्याची हातोटी. दूसरा महत्वाचा गुण म्हणजे अमोघ वक्तृत्व. तिसरा गुण म्हणजे ऐतिहासिक दाखले देण्याची कला.  गिंगरीच हे स्वत: इतिहास या विषयाचे शिक्षक होते. त्यामुळे ऐतिहासिक दाखले ते अगदी सहज देऊ शकतात. चौथा महत्वाचा गुण म्हणजे कल्पनांचे वैविध्य आणि नावीन्य. कोणत्याही प्रश्नांवर नावीन्यपूर्ण आणि विविध कल्पना जेव्हा गिंगरीच सुचवू लागतात तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे मती थक्क होऊन जाते. पाचवा महत्वाचा गुण म्हणजे वाद विवादाची कला. वाद विवादामध्ये समोरच्याला आपल्या तर्कबद्ध, आणि अलंकारित भाषेनी जेव्हा गिंगरीच उत्तरे देऊ लागतात तेव्हा त्यांना निरुत्तर करणे जवळपास अशक्य होऊन बसते. गिंगरीच यांची वाणी अलंकारित भाषा जशी सहज बोलू शकते तशीच तलवारीचे सापासप वारही लीलया करू शकते. किंबहुना त्यांच्या वाणीचा विषारी विखार प्रतिपक्षाला दीर्घकाळ वेदना देऊ शकतो. उपहासाचा वक्तृत्वामध्ये गिंगरीच यांच्याएवढा चपखल वापर कोण्या राजकरण्याने केलेला मी तरी अजून पहिले नाही. अशा उपहासानी निर्माण होणारी शरमांदगी ही दीर्घ काळ टिकणारी असते.

गिंगरीच यांनी आपल्या या सर्व गुणांचा वापर साऊथ कॅरोलिनाच्या वाद विवादांमध्ये अत्यंत बखुबीने केला.  त्यातच वाद विवादाच्या आधी गिंगरीच यांच्या दुसर्‍या घटोस्फोटीत पत्नीने त्यांच्यावर जाहीर आरोप केला कि गिंगरीच यांनी तिच्यासमोर लग्न चालू ठेवण्यासाठी “open marriage” ची अट ठेवली. Open Marriage याचा अर्थ लग्न जरी झाले असेल तरी लग्नातील कोणत्याही व्यक्तीने लग्नाबाहेर इतर स्त्रीशी किंवा पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवायचे. गिंगरीच यांची अत्तापर्यन्त तीन लग्ने झाली आहेत. पहिली दोन्ही लग्ने मोडण्याची कारणे म्हणजे त्या लग्नामध्ये गिंगरीच यांनी ठेवलेले विवाहबाह्य संबंध. गिंगरीच यांची दुसरी आणि तिसरी पत्नी ही त्यांची अनुक्रमे अलीकडील विवाहातील विवाहबाह्य प्रेयसी होती. साऊथ कॅरोलिनाच्या वादविवादाची सुरुवात CNN च्या सूत्रसंचालकाने गिंगरीच यांना त्यांच्या दुसर्‍या पत्नीने केलेल्या आरोपबद्दल प्रश्न विचारून केली. सचिन तेंडुलकरला एखाद्या spinner ने full toss बॉल द्यावा आणि त्याने उत्तुंग षटकार ठोकावा अशाप्रकारे गिंगरीच CNN च्या सूत्रसंचालकावर बरसले. त्यातून जो प्रेक्षकवर्ग होता तो रिपब्लिकन पक्षाचा होता. रिपब्लिकन लोकांची अशी धारणा आहे की अमेरिकेतील media हा पुरोगामी लोकांना झुकते माप देतो किंबहुना media अतिशय पक्षपाती आहे. उदाहरण द्यायचे असेल तर भाजप आणि संघवाल्यांना असे विचारले की भारतीय media नरेंद्र मोदींना कशाप्रकारे वागवतो तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल? तशीच धारणा रिपब्लिकन पक्षाची अमेरिकन media बद्दल आहे. गिंगरीच यांचा या प्रश्नावर मोठा आक्षेप असा होता की जी घटना 10 वर्षांपूर्वी घडली, जीचा मी इन्कार करतो त्याचा आणि देशासमोरील प्रश्नांचा संबंध काय? शिवाय गिंगरीच यांनी काही वर्षांपूर्वी धर्म बदलून Catholic धर्माचा स्वीकार केला. त्यांच्यामते त्यांच्या चारित्र्यातील उणिवांबद्दल त्यांनी परमेश्वराची क्षमायाचना केली आहे. असे सर्व असताना हा विषय अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या वाद विवादामध्ये काढण्याचे प्रयोजन काय? उदा. माझ्या चारित्र्यातील कमतरतांचा आणि अमेरिकेतील बेकरीचा, अमेरिकेच्या कर्जाचा संबंध काय?

या वादविवादामध्ये गिंगरीच यांनी जी सुरुवात केली त्यानंतर त्यांना थांबवण कितपत शक्य होतं? तर Sydney मध्ये भारतीय गोलंदाजांना Michael Clerk ला थांबवण जेवढ सोपं होतं तेवढं!  गिंगरीच यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने conservative philosophy इतक्या खुबीने सादर केली की कोणताही पुरोगामी पंडित थक्क होऊन जावा.

या सर्व घटकांचा परिपाक म्हणजे जे पंडित गिंगरीच संपले अशा आवया उठवत होते त्यांच्या नाकावर टिच्चून गिंगरीच यांनी तब्बल 12% जास्त मतांनी साऊथ कॅरोलिना मध्ये विजय मिळवला. यापुढे जाताना मात्र गिंगरीच यांना अजून कठीण प्रवास करायचं आहे. त्यांच्यासमोर आव्हाने मोठी आणि अवघड आहेत त्याला कारण म्हणजे यापुढे त्यांची उमेदवारी व्यवहार्य ठेवायची असेल तर त्यांना स्वत:ला काबूत ठेवायला लागेल इतकेच नाही तर स्वत:ला बदलायला लागेल.  गिंगरीच यांचे अनेक गुण दुर्गुण म्हणून समोर येऊ शकतात. याउलट रोमनी यांचे अनेक गुण त्यांना पुढे नेऊ शकतात. It all depends on who will transform his shortcomings into strengths and exploit the strengths to maximum!

आयोवा कोकस (caucus) २०१२

Leave a comment

आयोवा कोकस ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतील पहिली निवडणूक.  अमेरिकेतील प्रमुख पक्ष म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रट आपला उमेदवार ज्या प्रक्रियेतून ठरवतात त्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे आयोवा कोकस.  सान २०१२ च्या निवडणुकीत डेमोक्रट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पुन्हा निवडणूक लढवणार असल्यामुळे या वर्षी सर्व धामधूम रिपब्लिकन इच्छुकांची होती.  या कोकस चा निर्णय ३ जानेवारीला लागला आणि रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार मिट रोमनी हे फक्त ८ मतांनी विजयी झाले!  या विजायला विजय म्हणायचं का? हाही मोठा प्रश्न आहे पण ह्या सर्वांची चर्चा करण्या अगोदर सर्वप्रथम आपण कोकस आणि प्रायमरी म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊ.

कोकस या प्रक्रियेमध्ये राज्यातील त्या त्या पक्षाचे सदस्य गठ्या गठ्याने नियोजित जागी एकत्र येतात. उदा. एखाद्या जिल्ह्यामध्ये (अमेरिकन कौंटी) ज्या ज्या शहरांमध्ये जी नियोजित ठिकाणे असतील तिथे. त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतीनिधी किंवा प्रत्यक्ष उमेदवार एखादे भाषण देतात आणि मग पक्षाचे सदस्य कागदावर आपल्या उमेदवारचे नाव लिहितात. मग ही सर्व मते जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र करून त्या जिल्ह्याने कोणता उमेदवार निवडला हे जाहीर केले जाते. खरेतर या मतमोजणी नंतर जिल्ह्याचे प्रतींनिधी निवडले जातात. आयोवा राज्याला २५ प्रतीनिधी निवडता येतात. हे प्रतीनिधी नंतर प्रत्यक्ष उमेदवार निवडीच्या अधिवेशनात (convention) जातात आणि राज्यातील सदस्यांनी ज्या उमेदवारला निवडले आहे त्या उमेदवारला आपली मते देतात. राज्याच्या प्रतीनिधींनी राज्यातील सभासदांनी ज्या उमेदवारला निवडले आहे त्यालाच मत द्यावे अशी कायदेशीर सक्ती नाही, परंतु प्रतींनिधी कायमच राज्यातील सदस्यांचा मन राखून ज्याला सदस्यांनी निवडले आहे त्यालाच मत देतात.

आता या वर्षी मिट रोमनी आठ मतांनी विजयी झाले असल्यामुळे त्यांना रिपब्लिकन अधिवेशनात आयोवची २५ मते मिळतील.  एकंदर पक्षाचा अधिकृत उमेदवार होण्यासाठी २५०० हून अधिक अशा प्रकारची मते मिळवायची असतात. परंतु आयोवा नंतर न्यू हॅमप्षर (New Hampshire) ही राज्ये सर्वात आधी मतदान करीत असल्यामुळे जो विजयी होतो त्याला प्रचाराची गती (momentum) मिळते. त्यामुळे प्रचारासाठी अधिक पैसा, टीव्हीवर अधिक वेळ अशा गोष्टी उपलब्ध होतात. शिवाय या दोन राज्यांमधील प्राथमिक निवडणुकांमध्ये जे जिंकत नाहीत त्यातील जे हवसे नवसे आहेत ते बाहेर पडतात आणि मैदान साफ व्हायला सुरुवात होते.

आता या वर्षीच्या निवडणुकीकडे बघू. या वर्षी रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार मिट रोमनी हे फक्त ८ मतांनी विजयी झाले. दुसर्‍या स्थानावर अनपेक्षिपणे रिक संटोरम (Santorum) आले. या दोन उमेदवारणमध्ये जामीन आसमानाचा फरक आहे.  मीट रोमणी यांनी भजनलाल आणि बनसीलाल यांनी जितक्या वेळा आपले पक्ष बदलले असतील त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही इतक्यावेळा आपल्या भूमिका बदलल्या आहेत. त्याला करण देखील आहे आणि ते म्हणजे फक्त राजकीय सोय हे होय. मीट रोमनि हे अमेरिकेतील Massachusetts या अतिशय पुरोगामी राज्याचे राजकीय दृष्ट्या उजव्या पक्षाचे governor होते.  गवर्नर होण्यापूर्वी त्यांनी त्या राज्यातून सीनेट ची अपयशी निवडणूकही लढवली.  ती निवडनुकही त्यांनी जॉन केनेडी (Kennedy) यांच्या भावाविरुद्ध टेड केनडी यांच्याविरुद्ध.  साहजिकच त्यावेळेला सोयिस्कर भूमिका म्हणून त्यांनी स्वत:ला पुरोगामी म्हणवले.  त्यावेळी त्यांनी असे संगितले की आपण स्त्रियांना गर्भपात करण्याचा कोर्टाने मान्य केलेला अधिकार आपण कायम ठेवू जरि आपला स्वत:चा त्याला विरोधा असला तरी.  आता ते म्हणतात की आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर हा कोर्टाचा निर्णय फिरवू.  2008 साली रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी असाच प्रयत्न केला तेव्हा त्यांनी देशात  बेकायदेशीर परकीय (illegal immigrants) लोक राहत आहेत त्यांना कायदेशीर दर्जा च नव्हे तर नागरिकत्व (not only permanent resident status but also citizenship) देण्याला सशर्त पाठिंबा दिला होता. आता मात्र जेव्हा पक्षाचा बेस त्याला कडाडून विरोध करीत आहे हे लक्षात अलयावर त्यांनी या गोष्टीला विरोध केला. मीट रोमनी जेव्हा Massachusetts चे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी वैद्यकीय खर्चासाठी सरकारी विमा योजना काढली.  त्या योजनेमध्ये असा विमा घेणे हे Massachusetts च्या नागरिकांना बंधनकारक केले.  बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी अशाच स्वरूपाची योजना देश पातळीवर राबवली.  यावेळेला मात्र रिपब्लिकन पक्ष या योजनेला विरोध करीत आहे.  अशी योजना म्हणजे सरकार तुमची उपाय योजना ठरवणार, ही योजना म्हणजे socialism आहे अशा स्वरूपाचा अपप्रचार सर्व ओबामा विरोधक करीत आहेत.  आणि त्या मध्ये मिट रोमनी देखील सहभागी झाले आहेत.  अशाप्रकारे मिट रोमनींनी अनेक कोलन्ट्याउड्या मातल्या आहेत. आणि हीच गोष्ट रिपब्लिकन पक्षाच्या बेसला पटत नाही.  याशिवाय एक प्रश्न आहे तो म्हणजे रोमनींच्या धर्माचा.  आपल्याला असे वाटते की ख्रिश्चन धर्म एकच हे परंतु वस्तुस्थिती तशी नाही.  ख्रिशन धर्मामध्ये, रोमन कॅथॉलिक, बापटिस्ट (Baptist) तसेच मोर्मन नावाचाही एक पंथ आहे. मोर्मन हा पंथ तुलनेणी नवा असल्याने आणि या पंथा बाबत अनेक गैरसमज असल्याने अमेरिकेतील अनेक ख्रिश्चन धर्मीय या पंथाला cult असे समजतात. रोमनी हे मोर्मन असल्यामुळे त्यांना कट्टर ख्रिश्चन पंथीयांचा विरोध आहे.

ही झाली रोमनी विरोधाची बाजू. आता सनटोराम (santorum) यांची भूमिका आपण जाणून घेवूयात. साण्टोरम हे अतिशय उजव्या विचारसरणीचे आहेत. अमेरिका हा देश ख्रिश्चन मूल्यांवर उभा राहिला असून अशी मूल्ये सरकारच्या कार्यक्रमात दिसली पाहिजेत. अबोर्शन वर बंदी घातली पाहिजे. गरिबांसाठीच्या योजना कमी केल्या पाहिजेत आशाई त्यांची विचारसारणी आहे. अशा विचारसरणीमुळे मुख्य निवडणुकीत ते विजयी होणार नाहीत म्हणून जनमत चाचण्यांमध्ये ते मागे राहिले. रोमनींनी प्रचंड पैसा खर्च केला आणि साण्टोरम यांच्याकडे पैशाचे पाठबळ नसल्यामौळे त्यांनी अगदी साधा परंतु मेहनती प्रचार केला. सभे मध्ये एक जरी व्यक्ति उपस्थित असेल तरी त्या व्यक्तीशी संवाद साधायचा, कुटुंबाचे महत्व, धर्माचे महत्व पटवून द्यायचे, तळागाळतल्या व्यक्तीशी संवाद साधायचा, आपले आजोबा कसे कष्टकरी खाणकामगार होते, आणि आपणही कसे कष्टकरी कुटुंबातून आलो आहोत याच्या गोष्टी सांगून त्यांनी लोकांची मने आणि मते जिंकली. अजून एक गोष्ट साण्टोरम यांच्या पथ्यावर पडली ती म्हणजे आयोवा मधील मतदार हा अत्यंत उजव्या विचारसरणीचा आहे. उदा. पुण्यामधील सदाशिव आणि नारायण पेठेतला मतदार जसा आहे तसा. या सर्व गोस्थिंमुळे साण्टोरम यांनी अतिशय कडवी लढत मीट रोमनी यांना दिली.

आयोवा निवडणुक जरी अत्यंत अटीतटीची झाली असली तरी न्यू हॅम्पशायर मध्ये मात्र रोमनी यांनी सहजगत्या विजय नोंदवला. त्याला कारण की मीट रोमनी हे जवळच्याच मासेच्युसेत्त्स (Massachusetts) या राज्याचे गव्हर्नर होते, त्यांचे एक घरही न्यू हॅम्पशायर मध्ये आहे. शिवाय न्यू हॅम्पशायर मधील रिपब्लिकन मतदार हा तुलनेणी उदारमतवादी आहे. या मतदारला कोणता उमेदवार ओबामांना निवडणुकीत हरवेल हे जास्त महत्वाचे वाटते.

आयोवा आणि न्यू हॅम्पशायर या प्राथमिक निवणुका जिंकून एमआयटी रोमनी यांनी मोठी मजल मारली हे निश्चित! मात्र ह्या लढाया जिंकून ते युद्ध जिंकतात का नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.  एक मात्र निश्चित म्हणता येईल की this campaign is now Romney’s to lose!

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०१२

3 Comments

भूमिका

निवडणूक म्हटले की आपल्या सर्वांना प्रचाराची घाईगर्दी, पोस्टर ची जंत्री, भिंती रंगवणे, आणि प्रचाराच्या सभांची रणधुमाळी असे चित्र डोळ्यांसमोर येते. असेच काहीसे चित्र मी २००४ साली मनात ठेवून माझी पहिली अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अनुभवत होतो. परंतु मनातील चित्र आणि वस्तुस्थितीतला अनुभव यात जमीन आसमानाचा फरक होता. त्याचे कारणही होते ते म्हणजे अमेरिकेत येऊन मला जेमतेम ३ वर्षे होत होती. या तीन वर्षातील दोन वर्षे तर मी एक विद्यार्थी होतो. त्यामुळे केबल चॅनलची वानवा, तुलनेनी अमेरिकन लोकांशी कमी असणारा संबंध आणि माझा अमेरिकन राजकारणचा जुजबी अभ्यास अशा कारणांमुळे हा फरक मी अनुभवला. २००८ सालच्या निवडणुकीपर्यंत मात्र राजकारणाचा अभ्यास वाढला होता. राजकारणाची मूळापासून आवड होती, त्यातून अमेरिकेचे local राजकारण जगावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम करते याचा अनुभव इराक युद्धमुळे आला होता. मग स्वाभाविकच अमेरिकेतील पक्ष कोणते, त्यांच्या विचारधारा काय आहेत, या विचारधारांचा जनमानसाशी कसा संबंध आहे, इथले प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा राजकीय पक्ष शोधतात तेव्हा पक्षीय विचारसरणीचा पगडा त्या solutions वर कसा असतो, तसेच इथली राजकीय व्यवस्था कशी आहे, इथले सरकार कसे चालते, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था कशा आहेत इत्यादींचा अभ्यास नकळत सुरू झाला. बघता बघता २०१२ सालच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि अशी कल्पना आली की आपला अभ्यास मायदेशातील लोकांशी share करता आला तर? यातून हा लेखन प्रपंच सुरू झाला.

यात सर्वप्रथम आपण इथले राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिका यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

 

राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिका.

अमेरिकेमध्ये प्रामुख्याने केवळ दोन राजकीय पक्ष आहेत. १) डेमोक्रॅटिक पार्टी आणि २) रिपब्लिकन पार्टी. याशिवायही काही पक्ष आहेत परंतु त्यांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे. या नगण्य पक्षांमधील एक प्रमुख पक्ष आहे तो म्हणजे लिबर्टेरियन पार्टी. परंतु हा पक्ष एक विचारधारा म्हणून जास्त प्रभावी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जो संघटनेचा आराखडा (organizational structure) लागतो तो मात्र या पक्षाकडे अजिबात नाही त्यामुळे विचारधारेच्या जवळीकीमुळे या विचारधारेचे लोक सर्वसाधारणपणे रिपब्लिकन पक्षाला मत देतात. याखेरीजहि ग्रीन पार्टी नामक अजून एक माहीत असलेला पक्ष आहे. अमेरिकेत दोनच पक्ष का? या प्रश्नाचे उत्तर अनेक धुरीणाना अजून सापडलेले नाही. आपल्या भारतीय मांनासिकतेतून पहिले तर मात्र एक कारण स्पष्टपणे जाणवते. आपल्याकडे अनेक पक्षांची जी खोगीरभरती आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक मताला पक्षाच्या मतापुढे आपल्या समाजात काहीही स्थान नाही. एखाद्या व्यक्तीचे मत पक्षाच्या मताविरुद्ध असेल तर आपला समाजहि ते मान्य करीत नाही मग स्वाभाविकच मतभेद झाले की पक्ष सोडून जाऊन नवीन पक्ष स्थापन करण्यावाचून पर्याय राहत नाही. मात्र असा प्रकार अमेरिकेत अजिबात नाही. इथे पक्षाची जी मूल विचारसारणी आहे त्या विचारधरणेचेच कार्यकर्ते किंवा नेते असतात. मात्र काही बाबतीत मतभेद झाले तरी आपण आपल्या माठावर टिकून राहायला मुभा असते. कोणी कुणाला काढून टाकण्याचे काही कारणच नाही कारण “दोन व्यक्तींचे सर्वच विचार सारखे असतील असे असूच शकत नाही” इतपत समजण्याएवढी आणि मान्य होण्याएवढी राजकीय प्रगल्भता इथे आहे. शिवाय पक्षाचा उमेदवार म्हणून प्रत्येकाला “primary” च्या दिव्यातून जावे लागतेच. “प्रायमरी”म्हणजे काय हे आपण यथावकाश पाहणारच आहोत. अशा मोकळ्या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे जगात ज्या “डाव्या” आणि “उजव्या” राजकीय विचारसारणी आढळतात त्याच दोन विचारसरणीचे दोन पक्ष इथे दिसतात.

अमेरिकेतील पक्ष समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे की अमेरिका हे एक मोठे आणि बलाढ्य राष्ट्र असे आज आपल्याला जारी दिसत असले तरी ह्या राष्ट्राच्या जन्माच्यावेळी याचे स्वरूप म्हणजे वसाहतींचा समूह (collection of colonies) असेच होते. या राष्ट्राचे नाव देखील United States of America असेच आहे. या राष्ट्राच्या जन्माच्यावेळी कोणताही राजकीय पक्ष अस्तीत्वात नव्हता. राजकीय पक्षांचे आजचे हे स्वरूप १९७६ सालापासूनच्या राजकीय उत्क्रांतीचे परिणामस्वरूप आहे. जसजसे राष्ट्र आकार घेऊ लागले, राजकीय जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या, विचारधरणेतील मतभेद स्पष्ट होऊ लागले तस तसे राजकीय पक्षांचे स्वरूप मूर्त होऊ लागले. भारतात ज्याप्रमाणे राष्ट्रीय सभेची स्थापना होऊन त्याचे रूपांतर पुढे कोंग्रेस पक्षात झाले त्याच्या विरुद्ध प्रवाह अमेरिकेत आढळतो. इथे प्रथम राज्यकारभार चालू झाला, राजकीय स्वातंत्र्यानंतर राजकीय, वियचारिक मतभेद झाले आणि त्यातून आखीव (organized) पक्षांची निर्मिती झाली.

डेमोक्रटिक पार्टी

आजची डेमोक्रटिक पार्टी आणि १५० वर्षांपूर्वीची डेमोक्रटिक पार्टी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

किंबहुना आजची डेमोक्रॅटिक पार्टी ही काही मुद्यावर पूर्वीच्या रिपब्लिकन पार्टी सारखी दिसते.

थॉमस जेफरसनला डेमोक्रटिक पार्टीचा प्रणेता म्हणून समजले जाते. Alexander Hamilton ह्याची विचारसारणी भरभक्कम केंद्रीय सरकार (strong central government) असावं अशा स्वरूपाची होती. या विचारसरणीला थॉमस जेफरसन, जेम्स मेडिसन या दिग्गजांचा विरोध होता. हे राष्ट्र निरनिराळ्या राज्यांचा समूह आहे आणि त्याच्या या जन्मजात स्वरूपामुळे केंद्रीय सरकार मर्यादित असावे आणि राज्यांकडे जास्त अधिकार असावेत अशी विचारसारणी थॉमस जेफरसन आणि जेम्स मेडिसन या धुरीनांची होती. या धुरीनांच्या समर्थकांना Deomocratic-Republican Party असे संबोधले जायचे. Alexander Hamilton  च्या विचारसरणीच्या समर्थकांना Federalist पार्टी म्हणून संबोधले जायचे. मात्र १८१२ च्या ब्रिटीशांबरोबरच्या युद्धानंतर आणि Hamilton च्या मृत्यूनंतर फेडेरलिस्ट पार्टीचा अस्त झाला आणि देशामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी हा एकमेव प्रबळ पक्ष अस्तीत्वात राहिला.

मात्र १८५०-६० च्या सुमारास आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला. गुलामगिरी नैतिक दृष्ट्या योग्य काशी यावर थॉमस जेफरसन सारखा मोठा नेता देखील विचार करी असे. परंतु आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीला एक आर्थिक किनार देखील आहे. दक्षिण अमेरिकेची (दक्षिण अमेरिका हा continent नाही तर अमेरिकेचा दक्षिण भाग) अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून तर उत्तर अमेरिकेची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून. शेती ही प्रामुख्याने मनुष्यबळावर अवलंबून असल्यामुळे, दक्षिणेकडील श्रीमंत शेतकरी हे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीविरोधात अजिबात नव्हते कारण फुकटचे मनुष्यबळ त्यांच्या फायद्याचे होते. याउलट उत्तरेकडील लोकांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती कारण गुलामांना आपला मालक सोडून जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध असूनही त्यांना कोणतेच स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीचा उपयोग उत्तर अमेरिकेतील व्यापारी लोकांना होत नव्हता. नैतिक कारण प्रबळ की आर्थिक कारण प्रबळ ठरले यावर मतभेद असू शकतील परंतु सर्वसाधारणपणे अमेरिकेचे नागरी युद्ध नैतिक युद्ध म्हणूनच समजले जाते. गुलामगिरीच्या प्रश्नाला राज्यांचे अधिकार आणि केंद्रीय सरकारचे अधिकार या अंगाची देखील एक झालर आहे. आपण पहिले की डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्ष हा सर्वसाधारणपणे राज्यांच्या अधिकाराच्या बाजूचा होता. परंतु गुलामगिरीचे उच्चाटन हा राज्यांच्या अखत्यारीतला प्रश्न नसून तो संपूर्ण देशाचा प्रश्न आहे अशा मतावर या पक्षाची विभागणी झाली. ज्या लोकांनी गुलामगिरीला विरोध केला त्यांचा समूह रिपब्लिकन पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला तर राज्यांच्या अधिकाराला जास्त महत्व देणारे डेमोक्रट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे देशात दोन पक्ष अस्तीत्वात आले. पुढे जागतिक मंदी च्या काळात (depression) अमेरिकेची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलंडुन पडली कारण त्याकाळी कोणतीही central banking  system    अस्तीत्वात नव्हती. जागतिक मंदीच्या काळात तथाकथित free  market नि सामान्य लोकांना काहीच मदत केली नाही. अशावेळी सरकारने सामान्य माणसाला मदत केली पाहिजे. सरकारचा सहभाग अशा अडचंनींच्या काळात सामान्य माणसाला मदत करणारा असा असावा अशा पुरोगामी विचारांचे फ्रॅंकलिन रुझोवेल्ट अमेरिकेला राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभले. रुझोवेल्ट यांनी अनेक दूरदर्शी, युगप्रवर्तक अशा योजना राबवल्या. त्यातील Social Security ही एक महत्वाची योजना. मात्र अशाप्रकारे केंद्रीय सरकारचा वाढत जाणारा आकार हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, सरकारच्या हातात सर्व सत्ता एकत्रित केली गेली तर ते सरकार पुढे जुलुमी बानु शकते, केंद्रीय सरकारपेक्षा राज्यांना जास्त अधिकार पाहिजेत अशा विचारसरणीचे डेमोक्रट्स मात्र यामुळे दुखावले जाऊन ते रिपब्लिकन पक्षात सहभागी झाले. फ्रॅंकलिन रुझोवेल्ट यांचा मृत्यू दुसरे जागतिक युद्धं संपण्यापूर्वी झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपची फाळणी झाली आणि लोकशाहीवादी युरोप आणि कम्युनिस्ट युरोप असे दोन युरोप निर्माण झाले. कम्युनिझम हे एक मोठ भूत आहे आणि त्याने व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, समाजवाद हा व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे, समाजवादात सर्वशक्तिमान सरकार लोकांचे अधिकार आणि हक्क हिरावून घेते, जर अमेरिकेतील सरकार अशा प्रकारे सर्वशक्तिमान झाले तर स्वातंत्र्याचा लोप होईल त्यामुळे सरकारच्या आकाराला मर्यादित ठेवले पाहिजे अहस प्रकारची विचारसारणी रिपब्लिकन पक्षात जोर धरू लागली. या लोकांचा स्वाभाविकच फ्रॅंकलिन रुझोवेल्ट यांच्या धोरणांना आणि पर्यायाने डेमोक्रॅटिक पार्टीला विरोध होता. अशाप्रकारे अमेरिकन राजकीय पक्षांची निर्मिती थोडक्यात सांगता येईल.

डेमोक्रॅटिक विचारधारा

  • सरकारने लोकहितवादी धोरणे राबवली पाहिजेत. असे करताना व्यक्तिस्वातंत्र्याचा थोडा संकोच झाला तरी चालेल.
    • लोकहितवाडी धोरणांची उदाहरणे. गरीबांना अन्नासाठी स्टॅम्प देणे, बेरोजगारांना भत्ता, पर्यावरण नियंत्रण, बँकांवर, स्टॉक मार्केट वर नियंत्रण. इत्यादि.
    • आर्थिक आणि सामाजिक समता, ही प्रमुख सरकारची मुख्य उद्दिष्टे असली पाहिजेत.
    • श्रीमंतांवर अधिक कर लागू करावा.
    • स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार असला पाहिजे.
    • समलिंगी संबंध हे जनुकीय रचनेशी संबंधित असावे. समलिंगी जोडप्यांना इतर जोडप्यांसारखेच अधिकार असले पाहिजेत.
    • प्रश्न युद्धाने सोडवण्यापेक्षा सामोपचाराने सोडवले पाहिजेत.
    • ग्लोबल वॉर्मिंग ही खरी गोष्ट आहे आणि त्याला मनुष्याची अतिरेकी जीवनसारणी कारणीभूत आहे.
    • धर्म आणि सरकार यांची गल्लत करता कामा नये.

रिपब्लिकन विचारधारा

  • सरकारचे स्वरूप मर्यादित असले पाहिजे. प्रत्येक व्यक्ति सरकरविना व नियंत्रणरहित वातावरणात  आपला उत्कर्ष स्वत: साधू शकते.
  • सरकारने उद्योग धंद्यावर नियमांचा बोजा ठेवू नये कारण त्याने रोजगार्निर्मितीला अडथळा निर्माण होतो.
  • सरकारने वायफट खर्चाला आळा घातला पाहिजे. (याचा बर्‍याच वेळेला अर्थ असा होतो की गरीबांना अन्नासाठी स्टॅम्प देणे हा वायफट खर्च आहे.)
  • श्रीमंतांवर कर कमी असावा कारण ते रोजगारनिर्मिती करतात.
  • गर्भपात बेकायदा ठरवावा.
  • समलिंगी संबंध ठेवणे हे ऐच्छिक असून ते पाप आहे (कारण बायबल तसे सांगते). समलिंगी संबंधांना मान्यता दिली तर प्रचलित लग्न व्यवस्था मोडीत निघेल. लग्न हे एक पुरुष आणि एक स्त्री यांमध्येच असू शकते, दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांना लग्नाचा अधिकार नाही.
  • अमेरिकेचे जगातील स्थान महत्वाचे असून अमेरिकेला युद्धं करण्यासाठी कोणाचीहि परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
  • ग्लोबल वॉर्मिंग हे थोतांड आहे. विशेषत: मानवाची कृत्ये ग्लोबल वॉर्मिंगला करणीभूत आहेत हे थोतांड आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जगातील सर्व प्रश्नांना अमेरिका काशी जबाबदार आहे हे जगाच्या माथी मारण्यासाठी यूरोपियन आणि इतर उदारमतवादी, पुरोगामी लोकांनी रचलेले हे एक कुभांड आहे. यातून अमेरिकेवर, इथल्या उद्योग धंद्यावर नियंत्रणे आणायची आणि अमेरिकेचे जगातील नंबर एकचे स्थान हिरावून घेण्याचे एक कारस्थान आहे.
  • अमेरिकन राष्ट्र हे Judeo-Christian  philosophy वर आधारित आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.