साऊथ कॅरोलिनाची प्रायमरी ही यंदाच्या अमेरिकन निवडणुकीतील अत्यंत महत्वाची पायरी होती. महत्वाची अशासाठी की एक तर रिपब्लिकन पक्षाचा उमदेवर या निवडणुकीनी ठरवून टाकला असता किंवा, ही प्रायमरी निवडणूक ही दीर्घकाळ चालणार आणि त्याचे नुकसान रिपब्लिकन पक्षाला होणार असे ठरवणारी ही निवडणूक होती. मग नक्की झाले काय? झाले कसे? याच्यातून राजकारणाचा अभ्यास करणार्याने शिकायचे काय? हे सर्व आपण थोडक्यात बघू.
या निवडणुकीनी एक मात्र ठरवले की रिपब्लिकन प्रायमरी ही दीर्घ प्रक्रिया राहणार आणि कदाचित अनेक धक्का देणारे निकाल आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील.
साऊथ कॅरोलिनाचे धडे काय?
- राजकरणामध्ये कोणी संपला असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. “अमुक संपला!” अशी भविष्यवाणी राजकरणात करणे तर बहुधा मूर्खपणाचे ठरते.
- वक्तृत्वाचे महत्व अमेरिकन राजकरणामध्ये देखील अनन्यसाधारण आहे.
- निवडणुका जिंकायच्या असतील तर शिक्षण, व्यवसाय महत्वाचा नाही तर लोकांशी नाळ बांधणे महत्वाचे.
- अमेरिकन राजकरणामध्ये जो माणूस आपली राजकीय विचारधारा, तत्वज्ञान उत्तमप्रकरे मांडू शकेल तो लोकांची मने आणि मते जिंकू शकेल. हा मुद्दा महत्वाचा! (जो दोन्ही पक्ष विसरून चालले आहेत).
- राजकरणामध्ये कायमच सावध पवित्रा घेणे योग्य नाही.
- अमेरिकन राजकारण जे कन्सलटंट शिवाय चालत नाही, अशा राजकरणामध्ये कन्सलटंट किती महत्वाचे आणि अंत:स्फूर्ति किती महत्वाची याचा विचार राजकीय लोकांनी केला पाहिजे.
साऊथ कॅरोलिनाची प्रायमरी आपल्याला हे सर्व धडे कसे शिकवते हे आपण या लेखात पाहणार आहोत.
नक्की झाले काय?
या निवडणुकीमध्ये जाताना सर्व राजकीय पंडित असे मानीत होते की,
- मीट रोमनी हे ही निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी, संपूर्ण निवडणुका पूर्ण होण्याआधीच जिंकतील आणि प्रायमरी मध्ये जी चिखलफेक होते ती टाळून आपली सर्व शक्ति ओबामांच्या विरोधात जवळपास 9 महीने अगोदर पासून लावतील. (गंमत आहे! 9 महीने हे निवडणुकीच्या कॅलेंडरला लागू होतात आणि तेवढ्याच वेळात नवीन मानवी जीव देखील जन्म घेतो!!)
- एखादा कसलेला CEO जसा एखाद्या कंपनीचा कायापालट करतो तशा प्रकारे मीट रोमनी ही निवडणुकीची बाजी मारतील.
- ओबामांच्या विरुद्ध मीट रोमनी हेच रिपब्लिकन पक्षाचे सर्वोत्तम प्रतिस्पर्धी आहेत.
- रिपब्लिकन पक्षातील कडव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा प्रायमरी निवडणुकीत जाणवणार नाही.
अशा अनेक तर्क वितर्कान्ना छेद देऊन न्यूट गिंगरीच यांनी ही निवडणूक 40% मते जिंकून जिंकली. गिंगरीच यांनी रोमनी यांच्यापेक्षा तब्बल 12% मते जास्त मिळवली. गिंगरीच संपले अशा अवया उठवणार्या पंडितांचे भविष्य गिंगरीच यांनी कष्टाच्या जोरावर चुकीचे ठरवले. तळगाळातल्या रिपब्लिकन मतदारांशी नाळ जोडत, ओबामांच्या पुरोगामी विचारसरणीला (progressive/liberal) आपल्या परंपरावादी (conservative) विचारसारणीने अतिशय सडेतोड उत्तरे देत गिंगरीच यांनी ही बाजी मारली.
हे झाले कसे?
हे झाले कसे असा विचार माझ्या मनात जेव्हा आला तेव्हा भोंडल्यातल्या “अस्से कस्से जाले, माझ्या नशिबी आले”, असे मीट रोमनी आता म्हणत नसतील ना असे उगाचच वाटून गेले.
न्यूट गिंगरीच यांनी बाजी मारली यात शंकाच नाही पण त्याचबरोबर मीट रोमनी यांनी हातातला सामना घालवला असेही म्हणायला हरकत नाही.
रोमनी यांच्या व्यक्तिमत्वातल्या कमतरता
मीट रोमनी हे कॅपिटल मॅनेजमेंट या व्यवसायात आहेत. अशा प्रकारचे व्यावसायिक मोठाले म्यूचुअल फंड्स कडून पैसा घेतात आणि तो पैसा निरनिराळ्या धंदयानमद्धे गुंतवतात. जेव्हा अशा धंद्यामध्ये फायदा होतो तेव्हा हे कॅपिटल मॅनेजर फी या रूपात पैसा कमावतात. अमेरिकेतील टॅक्स धोरण असे आहे की जरी ही फी उत्पन्न म्हणून असली तरी ती फी या स्वरुपात असल्याने तिला इन्कम टॅक्स लागू होत नाही. अशा उत्पन्नाला deferred interest payment असे संबोधले जाते आणि त्याच्या वरचा टॅक्स वेगळा आणि कमी असतो. त्यामुळे सध्याच्या काळात जेव्हा गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढते आहे, श्रीमंत कोणत्याही परिस्थितीत आपली श्रीमंती टिकवतात आणि वाढवतात आणि त्याच वेळी, कालचा मध्यमवर्ग आजच्या गरीब वर्गात गणला जातो, अशावेळी रोमनींचे टॅक्सेस हा एक मोठा चर्चेचा विषय झाला. रोमनींच्या कोलांट्याउड्या मारायच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आपण आपले इन्कम टॅक्स रिटर्न जनतेसमोर मांडणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर त्यांचे विरोधक तुटून पडले.
रोमनी हे आपला खासगी व्यावसायिक अनुभव मोठ्या अभिमानाने मिरवीत होते. आपल्या कॅपिटल मॅनेजमेंट च्या व्यवसायातून आपण 1 लाखाहून अधिक नोकर्या निर्माण केल्या अशा प्रकारचा दावा ते सतत करीत असत. रोज रोज हे ऐकायला लागल्यावर त्याची स्क्रुटिनी होणारच! कॅपिटल मॅनेजमेंट करणारी लोकं अनेकवेळेला डबघाईला आलेले व्यवसाय कवडीमोलणे विकत घेतात. विकत घेताना कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी आपला अशा डबघाईला आलेल्या कंपन्यांमधला हिस्सा वाढवते, कारण जेव्हा हा उद्योग सावरला जाईल तेव्हा याच हिश्ष्याची किंमत खूपच मोठी होते. कॅपिटल मॅनेजमेंट ह्या कंपन्या खासगी स्वरुपाच्या असल्यामुळे त्यांना रेपोर्टिंग चे बंधन नसते त्यामुळे ते व्यवसायाची पुनर्बांधणी उत्तम प्रकारे करू शकतात. अशा पुनर्बांधणी (restructuring) मध्ये कामगार कमी करणे, हा एक मोठा भाग असतो. त्यामुळे अनेकांना नोकर्यांना मुकावे लागते. तसेच bankruptcy दाखल करणे हे देखील मोठे साधन हाती असते. Bankruptcy दाखल केल्यावर अनेक प्रकारची देणी देणेकर्याला न देण्याची मुभा असते. त्यामुळे स्वाभाविकच असे धंदे फायदेशीर करून कॅपिटल मॅनेजमेंट कंपन्या ते धंदे मोठ्या फायद्याने विकतात. याचे एक उत्तम आणि सध्याच्या काळातील उदाहरण म्हणजे Chrysler मोटर कंपनी.
रोमनी हे अशा प्रकारच्या व्यवसायमध्ये असल्याने व त्यांनी आपले टॅक्स रिटर्न्स खुले न करण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांचे एक विरोधक Rick Perry हे तर असे म्हणाले की हा कसला आलाय “venture capitalist” हा तर “vulture (गिधाडे) capitalist” आहे. मी या लेखात मुद्दाम venture capitalist हा शब्द वापरला नाही कारण माझ्या मते रोमनी जे करतात त्याला कॅपिटल मॅनेजमेंट हाच योग्य शब्द आहे, venture capitalism हा अयोग्य शब्द आहे. आता जो पक्ष स्वत:ला capitalism चा रक्षणकर्ता समजतो त्याच पक्षाच्या उमेदवारांनी जेव्हा असे हल्ले रोमनिंवर चढवायला सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकच हा विषय मोठ्या चर्चेचा झाला. उदा. रोमनींच्या कारकिर्दीत नक्की किती नोकर्या निर्माण झाल्या? किती लोकांच्या नोकर्या गेल्या? अशाप्रकारचा व्यवसाय नैतिक दृष्ट्या योग्य आहे का? अशाप्रकारच्या व्यवसायिकांवर जो टॅक्स आकाराला जातो, ज्या अनेक प्रकारच्या करसवलती दिल्या जातात त्या योग्य आहेत का? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेचे गूराळ चालू झाले. यातून एक गोष्ट झाली की आत्तापर्यंत रोमनींना बचावाचा पवित्र कधीच घ्यायला लागला नव्हता तो आता त्यांना घ्यायला लागला. यातून त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. रोमनींच्या व्यक्तिमत्वातल्या कमतरता लोकांसमोर प्रखरतेनी येऊ लागल्या.
न्यूट गिंगरीच
न्यूट गिंगरीच हे अमेरिकन राजकारणातले एक अनोखे व्यक्तिमत्व आहे. गिंगरीच हे क्लिंटन यांच्या काळात अमेरिकन प्रतींनिधी सभागृहाचे सभापति होते. त्याकाळात गिंगरीच यांनी contract with America नावाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनामयामध्ये परंपरावादी (Conservative) विचारसरणीचे अनेक कार्यक्रम त्यांनी समाविष्ट केले. केंद्रीय सरकार अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असावे, बेकार भत्ता, मर्यादित स्वरूपाचा असावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना मदत करताना त्याला काळाचे बंधन असावे, अशा अनेक कल्पनांचा समावेश या contract with America या जाहीरनामयामध्ये होता. अवाढव्य अशा केंद्रीय सरकारचे स्वरूप बदलू शकणार्या या कल्पांनाना अमेरिकन नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला आणि अनेक वर्षांनंतर रिपब्लिकन पक्ष प्रतींनिधी सभागृहात सत्तारूढ झाला, आणि गिंगरीच सभागृहाचे सभापति झाले. सभापति या नात्याने कोणता विषय सभागृहात मांडायचा आणि कोणता विषय टाळायचा याचा मोठा अधिकार गिंगरीच यांना प्राप्त झाला. गिंगरीच यांनी क्लिंटन यांच्या बरोबर काम करीत अनेक सुधारणा केल्या परंतु आपला बेशिस्त आणि फटकळ स्वभाव त्यांना अडचणीचा ठरला. यातूनच पुढे नैतिक दुरवरतांनाच्या आरोपांमुळे त्यांना प्रतींनिधी सभागृहाचा राजीनामा द्यावा लागला.
गिंगरीच यांच्या कारकीर्दीमध्ये जारी अनेक चढ उतार झाले असले तरी त्यांच्याकडे अनेक गुण आहेत की ज्यामुळे त्यांना conservative तत्वज्ञानाचे विचारवंत असे ओळखले जाते. त्यांच्या गुणांमधला सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची विषय समजावून सांगण्याची हातोटी. दूसरा महत्वाचा गुण म्हणजे अमोघ वक्तृत्व. तिसरा गुण म्हणजे ऐतिहासिक दाखले देण्याची कला. गिंगरीच हे स्वत: इतिहास या विषयाचे शिक्षक होते. त्यामुळे ऐतिहासिक दाखले ते अगदी सहज देऊ शकतात. चौथा महत्वाचा गुण म्हणजे कल्पनांचे वैविध्य आणि नावीन्य. कोणत्याही प्रश्नांवर नावीन्यपूर्ण आणि विविध कल्पना जेव्हा गिंगरीच सुचवू लागतात तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे मती थक्क होऊन जाते. पाचवा महत्वाचा गुण म्हणजे वाद विवादाची कला. वाद विवादामध्ये समोरच्याला आपल्या तर्कबद्ध, आणि अलंकारित भाषेनी जेव्हा गिंगरीच उत्तरे देऊ लागतात तेव्हा त्यांना निरुत्तर करणे जवळपास अशक्य होऊन बसते. गिंगरीच यांची वाणी अलंकारित भाषा जशी सहज बोलू शकते तशीच तलवारीचे सापासप वारही लीलया करू शकते. किंबहुना त्यांच्या वाणीचा विषारी विखार प्रतिपक्षाला दीर्घकाळ वेदना देऊ शकतो. उपहासाचा वक्तृत्वामध्ये गिंगरीच यांच्याएवढा चपखल वापर कोण्या राजकरण्याने केलेला मी तरी अजून पहिले नाही. अशा उपहासानी निर्माण होणारी शरमांदगी ही दीर्घ काळ टिकणारी असते.
गिंगरीच यांनी आपल्या या सर्व गुणांचा वापर साऊथ कॅरोलिनाच्या वाद विवादांमध्ये अत्यंत बखुबीने केला. त्यातच वाद विवादाच्या आधी गिंगरीच यांच्या दुसर्या घटोस्फोटीत पत्नीने त्यांच्यावर जाहीर आरोप केला कि गिंगरीच यांनी तिच्यासमोर लग्न चालू ठेवण्यासाठी “open marriage” ची अट ठेवली. Open Marriage याचा अर्थ लग्न जरी झाले असेल तरी लग्नातील कोणत्याही व्यक्तीने लग्नाबाहेर इतर स्त्रीशी किंवा पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवायचे. गिंगरीच यांची अत्तापर्यन्त तीन लग्ने झाली आहेत. पहिली दोन्ही लग्ने मोडण्याची कारणे म्हणजे त्या लग्नामध्ये गिंगरीच यांनी ठेवलेले विवाहबाह्य संबंध. गिंगरीच यांची दुसरी आणि तिसरी पत्नी ही त्यांची अनुक्रमे अलीकडील विवाहातील विवाहबाह्य प्रेयसी होती. साऊथ कॅरोलिनाच्या वादविवादाची सुरुवात CNN च्या सूत्रसंचालकाने गिंगरीच यांना त्यांच्या दुसर्या पत्नीने केलेल्या आरोपबद्दल प्रश्न विचारून केली. सचिन तेंडुलकरला एखाद्या spinner ने full toss बॉल द्यावा आणि त्याने उत्तुंग षटकार ठोकावा अशाप्रकारे गिंगरीच CNN च्या सूत्रसंचालकावर बरसले. त्यातून जो प्रेक्षकवर्ग होता तो रिपब्लिकन पक्षाचा होता. रिपब्लिकन लोकांची अशी धारणा आहे की अमेरिकेतील media हा पुरोगामी लोकांना झुकते माप देतो किंबहुना media अतिशय पक्षपाती आहे. उदाहरण द्यायचे असेल तर भाजप आणि संघवाल्यांना असे विचारले की भारतीय media नरेंद्र मोदींना कशाप्रकारे वागवतो तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल? तशीच धारणा रिपब्लिकन पक्षाची अमेरिकन media बद्दल आहे. गिंगरीच यांचा या प्रश्नावर मोठा आक्षेप असा होता की जी घटना 10 वर्षांपूर्वी घडली, जीचा मी इन्कार करतो त्याचा आणि देशासमोरील प्रश्नांचा संबंध काय? शिवाय गिंगरीच यांनी काही वर्षांपूर्वी धर्म बदलून Catholic धर्माचा स्वीकार केला. त्यांच्यामते त्यांच्या चारित्र्यातील उणिवांबद्दल त्यांनी परमेश्वराची क्षमायाचना केली आहे. असे सर्व असताना हा विषय अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या वाद विवादामध्ये काढण्याचे प्रयोजन काय? उदा. माझ्या चारित्र्यातील कमतरतांचा आणि अमेरिकेतील बेकरीचा, अमेरिकेच्या कर्जाचा संबंध काय?
या वादविवादामध्ये गिंगरीच यांनी जी सुरुवात केली त्यानंतर त्यांना थांबवण कितपत शक्य होतं? तर Sydney मध्ये भारतीय गोलंदाजांना Michael Clerk ला थांबवण जेवढ सोपं होतं तेवढं! गिंगरीच यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने conservative philosophy इतक्या खुबीने सादर केली की कोणताही पुरोगामी पंडित थक्क होऊन जावा.
या सर्व घटकांचा परिपाक म्हणजे जे पंडित गिंगरीच संपले अशा आवया उठवत होते त्यांच्या नाकावर टिच्चून गिंगरीच यांनी तब्बल 12% जास्त मतांनी साऊथ कॅरोलिना मध्ये विजय मिळवला. यापुढे जाताना मात्र गिंगरीच यांना अजून कठीण प्रवास करायचं आहे. त्यांच्यासमोर आव्हाने मोठी आणि अवघड आहेत त्याला कारण म्हणजे यापुढे त्यांची उमेदवारी व्यवहार्य ठेवायची असेल तर त्यांना स्वत:ला काबूत ठेवायला लागेल इतकेच नाही तर स्वत:ला बदलायला लागेल. गिंगरीच यांचे अनेक गुण दुर्गुण म्हणून समोर येऊ शकतात. याउलट रोमनी यांचे अनेक गुण त्यांना पुढे नेऊ शकतात. It all depends on who will transform his shortcomings into strengths and exploit the strengths to maximum!